ठाकरे गटाला कोकणात मते मागण्याचा अधिकार नाही – नारायण राणे

कोकणासाठी काहीही न केलेल्या ठाकरे गटाला येथे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीका केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांमध्ये झालेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे सध्या महासंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगामध्ये प्रगतिशील देश म्हणून नावारूपास येत असून नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत साऱ्‍यांनी साथ देण्याचे आवाहनही केले. ठाकरे गटावर जोरदार टीका करताना आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील असा सुतोवाच केले. नारायण राणे म्हणाले, ‘‘केंद्रातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या काळात जो विकास झाला नाही तो विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षामध्ये केला आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यासह कोकण विकासासाठी नेमकं काय केले, राज्याचे कोणते विकासात्मक प्रश्‍न सोडविले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून शिवसेना आता संपलेली आहे. त्याचा जास्त विचार करू नका. त्यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदारही आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार नाहीत. लोकांना आता भाजपची गरज असून समाजातील सर्व घटकांसह तळागाळामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहचवा.’’

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून तो पक्ष आता संपला आहे. त्याचा जास्त विचार करू नका. त्यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदारही आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार नाहीत. लोकांना आता भाजपची गरज असून समाजातील सर्व घटकांसह तळागाळामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहोचवण्याचे आणि आगामी निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विजयी झेंडा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.