भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर असताना देशभरातील सतरा विरोधी पक्ष नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बैठक बोलावली होती.त्यात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. विदेश दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप विरोधात विरोधी पक्षाची आघाडी आवळणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे असा घणाघात करीत सर्व विरोधी पक्षाच्या घोटाळ्यावर चांगलाच समाचार घेतला आहे.विरोधी पक्षांच्या भ्रष्टाचाराची गोळाबेरीज केल्यास 20 लाख कोटींचा हा घोटाळा होईल अशी मला खात्री आहे अशा कडक शब्दात मोदींनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे मेरा बूथ,सबसे मजबूत या मोहिमेअंतर्गत 545 लोकसभा,मध्यप्रदेशातील 64 हजार 100 बुथच्या 10 लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना मोदींनी संबोधित केले यावेळी सर्व राज्याच्या विधानसभा मतदारसंघांमधील किमान 3 हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि यांच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्हाला गांधी परिवारातल्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला मुलायमसिंह यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही समाजवादी पार्टीला मतदान करा. तुम्हाला लालू प्रसाद यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीय जनता दलला मतदान करा. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. तुम्हाला अब्दुल्ला परिवारातील मुला-मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सला मतदान करा. तुम्हाला के.चंद्रशेखर राव यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही बीआरएसला मतदान करा. तुम्हाला करुणानिधी यांच्या मुला-मुलीचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही डीएमकेला मतदान करा. परंतु माझ्या एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा.
