पुण्यातील सदाशिव पेठेत काल (२७ जून) भयानक प्रकार घडला. भर दिवसा, भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी तेथील जमावाने बघ्याची भूमिका घेतल्याचं सीसीटीव्हीतील दृष्यातून स्पष्ट दिसत आहे. परंतु, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.
“काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
“दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा,” असंही राज ठाकरे म्हणाले.
पुण्यात सदाशिव पेठ येथे मंगळवारी सकाळी एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शंतनू लक्ष्मण जाधव असं या हल्लेखोर आरोपीचं नाव आहे. शंतनूचे सुतारदरा परिसरात राहणाऱ्या तरुणीसह प्रेमसंबंध होते. महाविद्यालयात बारावीला असताना त्यांचे संबंध जुळले होते. पण नंतर शंतनूच्या वागणुकीला कंटाळून तिने संबंध तोडले होते. यामुळे संतापलेला शंतनू तिला त्रास देत होता. यात संतापातून त्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. शंतनू तरुणीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच लेशपाल जवळगे या तरुणाने त्याला अडवलं. लेशपाल अभ्यासिकेत जात असताना त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि मदतीसाठी धाव घेतली. त्याने वेळीच मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला. यानंतर शंतनू पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.
