पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.
तसेच, या तरुणीसमवेत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलrस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते.त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली.
शहरातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’, ‘पोलिस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला पोलिसांची २५ दामिनी पथकं तयार करण्यात येणार असून हे पथके रोज शहरात गस्त घालणार आहेत. पुणे शहरात आतापर्यंत केवळ १५ दामिनी पथके होती. ही पथके वाढून ४० केली जाणार आहेत. पेट्रोलिंगसाठी आणखीन १०० बीट मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात बीट मार्शलची संख्या ही २०० होणार आहे. पुणे पोलीस शहरातील महाविद्यालयांमधे समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी २४ तास सुरु राहणार आहे.
