केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवड औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत.राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकतीच ४० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
चर्मोद्योग क्लस्टरच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये दिघी बंदराची जवळीक, वीज, पाणी आणि सीईटीपीचा समावेश आहे. पायाभूत सुविधा आणि विद्यमान औद्योगिक परिसंस्था याशिवाय, या उद्यानाच्या प्रस्तावित क्षेत्राजवळ लॉजिस्टिक पार्क देखील प्रस्तावित आहे. मुंबईच्या जवळ मेगा लेदर फूटवेअर आणि ॲक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेमुळे राज्यातील शाश्वत चर्मोद्योगाला मोठी प्रमाणात चालना मिळेल. देशाच्या चामड्याची निर्यातीत जेएनपीटी पोर्टचा २१ % वाटा आहे, यामुळे लॉजिस्टिकचा खर्च आणि वेळेची बचत करून, निर्यात क्षमतेमध्ये वाढ होईल. हा उपक्रम आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्राची वचनबद्धता दर्शवतो. रातवड येथील मेगा लेदर फुटवेअर आणि ॲक्सेसरीज क्लस्टर पार्क हे जागतिक लेदर मार्केटमध्ये राज्याच्या निरंतर यशासाठी प्रेरक ठरेल.
