नाशिक शहरात ईदनिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी नाशिक शहराऐवजी गुलशनाबाद नावाचे फलक दिसून आले. यावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक शहरात दाखल होते. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान नाशिक शहरात ईदनिमित्त होर्डिंग लावण्यात आले आहेत. यातील एका होर्डिंग्जवर गुलशनाबाद असे नाव देण्यात आले होते. यावरुन शहरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर दादा भुसे म्हणाले की, “माझ्याही कानावर ही बाब आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती असून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ही ते म्हणाले आहेत.
आज दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी मंत्री भुसेंना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांनी टीका केली आहे की, सरकार मधील सर्वात अपयशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजित पवारांनी असं कदाचित निराशेपोटी मनोगत व्यक्त केलं असेल, असं भुसेंनी सांगितलं. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या काळात अजित पवार हे व्यक्ती म्हणून धडाक्याने काम करायचे. पण तो धडाका इतका होता की, आम्हालाही सत्तेतून बाजुला सारलं जातं होतं. कदाचित आम्हाला बाजूला सारलं नसतं तर….. असं अर्धवट वाक्य बोलून भुसे मिश्किल हसले. दरम्यान, सगळे जण अतिशय पारदर्शक आणि गतीमानपणे काम करत असल्याचं मंत्री भुसे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कारवाई चौकशी केली. यात ठाकरेंचे निवकवर्तीय सुरज चव्हाण अडचणीत आले. असं असतांना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप करत महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी १ जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं. यावरही सामंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, पाठीमागील काळातील भ्रष्ट्राचाराची प्रकरणी उघडकीस येऊ लागली आहेत. त्यांच्या चौकशा सुरू असून अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं या कारवायांवरील लक्ष हटवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं भुसे म्हणाले.
