राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनने जवळजवळ ९९ टक्के देश व्यापला आहे. मागील आठवड्यापासून मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. अंदमान, निकोबार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, कोकण, गोवा तसेच राज्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होत आहे.परंतु राज्याच्या बहुतांश भागातील पाऊस ओसरताना दिसत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील मोठा पाऊस कमी झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत सुरु असलेला मुसळधार पावसामुळे कांदिवली पूर्वेमधील अशोकनगर परिसरात बाथरुमचा स्लॅब एका घरावर कोसळून 35 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. किशन धुला असे त्यांचे नाव आहे. अशोक नगर परिसरात आपल्या घरामध्ये असताना बाथरुमचा स्लॅब त्यांच्या घरावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
