शिवसेनेला केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता; शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता

शिंदे-फडणवीस सरकार आज वर्ष होत आहे काही दिवसापूर्वी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवली तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार ताशेरे ओढले. सत्ता संघर्षावरील निकालात राज्यातील शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकारला आत्मविश्वास मिळाल्याने आता राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अचानक दिल्लीत दौऱ्यावर आल्यानं या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. केंद्रातील महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या दोन मंत्र्यांचा शिंदे गटासाठी बळी जाणार याचीच चर्चा आता रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याच्या चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते मध्यरात्री उशिरा मुंबईत आले.या नेत्यांनी सुमारे तीन ते चार तास अमित शाह यांच्याशी चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत जात आहे.अमित शाह यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र, त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. फक्त विस्ताराच्या चर्चाच होत आहे. मात्र, कालची शाह यांच्यासोबतची शिंदे आणि फडणवीस यांची चर्चा फायनल चर्चा होती असं सांगितलं जातं. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत.

शिंदे गटाला केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोघांचा समावेश केला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्या बदल्यात महाराष्ट्रातीलच दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मात्र, शिंदे गटासाठी बळी जाणारे हे दोन मंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर केंद्रात शिंदे गटाकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे ही गुलदस्त्यात आहे.