ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका निवडणूक या उद्धव ठाकरे यांच्यामुळेच लांबल्या आहेत. त्यांनीच वेगवेगळ्या याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. या याचिकांवर कोर्टात सुनावणी होऊन लवकरच निकाल लागेल. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या पॉडकॉस्टमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी 29 रोजी ही मुलाखत एएनआयला दिली आहे. या वेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही ‘डबल गेम’ केल्याचा आरोप केला.

तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणूक आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्या आहेत, तुम्ही त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील.”

विधानसभआ निवणूक 2019 पूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात समझोता झाला होता. त्यामुळे दोघांनी भाजपविरोधात एकमेकांना मदत केली. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या जागा आणि बहुमत यांच्यात काही अंतर पडले. त्यामुळे आकडे फसतात हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली. आम्ही एकत्र निवडणुका लढलो होतो. मात्र, त्यांना महाविकासाघाडीसोबत जायचे होते तर त्यांनी युती तुटल्याचे आम्हाला सांगितले देखील नाही. आमचा फोनही घेतला नाही. केवळ स्वार्थासाठी त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आम्हाला धोका दिला. तर शरद पवार यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या नव्हत्या. ते आमचे विरोधकच होते. मात्र, त्यांनीआमच्यासोबत ‘डबल गेम’ केला, असे फडणवीस म्हणाले.