बारामतीत बॅनरबाजी, अजित पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो गायब; बॅनरवर नवीन चाणक्य

राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यांसोबत गेले. ते उपमुख्यमंत्री मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार मैदानात उतरले. दोन्ही गट जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी अन् पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात कोणाला यश मिळणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु शरद पवार यांच्या बारामतीत अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे. त्यावर शरद पवार यांचा फोटो नाही तर दुसरा नवीन चाणक्याचा फोटो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या समोरच हा बॅनर लागल्याने आज शहरात हा चर्चेचा विषय होता. एरवी राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामतीच्या आमदारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि या प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजाविणा-य देवेंद्र फडणवीस यांनाही चाणक्याची उपमा देत अभिनंदन करत भाजपनेच बाजी मारल्याचे दाखवून दिले आहे.

एकीकडे राष्ट्रवादीतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर नाट्यमय सत्तांतरानंतर आता बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चाणक्याची उपमा देत अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. बारामतीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा झाली.

अजित पवार सुद्धा आता सक्रीय झाले आहे. त्यांनी राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन अजित पवार करत आहेत. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष आपला निर्णय कळवणार आहे. उद्या बुधवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील बारामतीत अजित पवार यांना कार्यकर्त्यांकडून प्रोत्साहन देताना पहायला मिळतं आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत अनेकांनी बॅनर लावले आहेत. “आमचा विठ्ठल, आमचा दादा” या आशयाचे बॅनर लावल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्या बॅनरवरून चक्क शरद पवार यांचा फोटो नसल्याने अजित पवार यांची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून बंड करत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह मंत्री पदाची ही शपथही घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा सक्रिय होत त्यांना शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, या बॅनरबाजीमुळे अजित पवारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.