राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी 7 वाजता नागपुरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतल्यावर दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.
कोराडी मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे राष्ट्रपतींचा दौरा पाहता राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील. राष्ट्रपतींच्या दौ-यासाठी प्रशासन सज्ज असून कार्यक्रमस्थळी तसेच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. आज पोलिसांनी काफ़िल्याची रंगीत तालीम केली.
