राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची राज्यातील पहिली जाहीर सभा शनिवारी दुपारी तीन वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे. अजितदादा गटात सामील झालेले ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. या विश्वासू शिलेदाराने मंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत अंधारात ठेवल्याची बाब शरद पवार यांनी मिश्किल शैलीत कथन केली होती.
सुळे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु-शिष्याचं नातं अशी साऱ्यांना ओळख आहे. भुजबळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश ते आत्तापर्यंतच्या चांगल्या आणि पडतीच्या काळात शरद पवार पहाडासारखे पाठीशी उभे राहिले. तर छगन भुजबळ हे आजही शरद पवारांबद्दल बोलताना भावूक होतात. छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, ही गोष्ट राजकीय विश्लेषकांसाठी देखील धक्कादायक होती. पण छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या नात्यात अंतर आल्याचे दिसत आहे. कारण एकमेकांबद्दल प्रचंड आदर असणारे नेते आज एकमेकांविरोधात शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत.
बंडखोरीच्या मुद्यावर जनतेच्या दरबारात जाण्याचे जाहीर केल्यानंतर या राज्यव्यापी दौऱ्यास कधीकाळचे निकटवर्तीय भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि पदाधिकारी अजितदादा गटात सामील झाले आहेत. असे असताना पवार यांनी नाशिकची निवड करीत बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये या सभेची तयारी करण्यात आली आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना पवार आजच्या सभेत काय उत्तर देणार? भुजबळ आणि अजित पवारांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान पवारांच्या आजच्या सभेत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयावर शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. माझा फोटो लावू नये असे सांगून देखील या बॅनर पवारांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र सकाळी लावलेल्या बॅनरवरील फोटोसंध्याकाळी अचानक काढण्यात आले.
काय म्हणाले भुजबळ?
शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
भुजबळांबद्दल काय म्हणाले राऊत
छगन भुजबळ यांचा पराभव करु असे संजय राऊत म्हणाले होते. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहे. पराभव करायचे की नाही हे जनता ठरवेल. संजय राऊतांनी आधी एका ठिकाणहून निवडून येऊन दाखवावे असा टोला त्यांनी लगावला.
