राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी येवला येथील सभेत महाभारताचा दाखल देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनीमामाने असं म्हटलं. तसेच आता हा शकुनीमामा कोण? असा सवाल करत मला काही कळेना झालंय. मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा खोचक टोला लगावला होता. आता याच टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
जे लोक फडणवीस यांचा शकुनी मामा असा उल्लेख करत आहेत ते मागच्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात महाराष्ट्रात फिरत होते असा टोला त्यांनी लगावला.ते खासदार कधीही अतिवृष्टीमध्ये किंवा राज्याला आवश्यकता होती तेव्हा कुठे दिसते नव्हते. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात ते घोड्यावर होते, बैलगाडा शर्यतीत पण ते घोड्यावरच होते. ते कधी जमिनीवर आलेच नाही, त्यामुळे त्यांना वास्तविकता माहित नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
अमोल कोल्हे अतिशय उमदे अभिनेते आहेत. मनोरंजन म्हणून त्यांचे भाषण पाहावं, या पलीकडे त्यांच्या भाषणात काहीही नव्हतं. डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्तम करतात आणि लवकरच त्यांना कुठलातरी उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत असा खोचक टोलाही सुजय विखे यांनी लगावला.
खासदार सुजय विखे हे नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी विखे यांनी शरद पवार घेत असलेल्या सभांवरुन त्यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदारांच्या भविष्याची चिंता आहे, ते पुन्हा निवडून येणार नाही अशी टीका शरद पवार यांनी केली होती. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी या आमदारांनी वेगळा निर्णय घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसच्या नेत्यांशी आपण संपर्क साधत आहोत का? यावर बोलताना विखे म्हणाले आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क साधत नाही आहे. मात्र त्यांचे काहीजण वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधत आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क ठेऊन काही उपयोग नाही आहे, असे स्पष्ट मत खासदार सुजय विखे यांनी केले आहे.
