काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहे. सर्वांचा मान सन्मान ठेवला पाहिजे.परंतु कुणाला घ्याव, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे त्यासंदर्भात निर्णय घेतील असेही गिरीश महाजन म्हणाले.
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा गेले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे संपर्कात असल्याची चर्चा आहे? यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. पण आम्हाला पुन्हा तीन उपमुख्यमंत्री तसेच दोन मुख्यमंत्री करता येत नाहीत. पण कोणाला कधी घेणार, काय म्हणून घेणार हे सांगू शकत नाही. मात्र 2024 च्या निवडणुकांच्या (2024) आधी राज्यात मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
गिरीश महाजन म्हणाले, आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने अनेकांची खाते बदलतील. अनेकांचे कमी होतील. आधीच माझ्याकडेही दोन ते तीन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा पदभार आहे. तसेच तीन वेगवेगळी खाते आहेत. आता 40 मंत्री होतील. त्यामुळे खाते वाटली जातील, असंही महाजन म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जामनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भाला काय दिलं किती निधी दिला? सिंचनासाठी कोणतीही योजना दिली नाही. कोणत्या योजनेसाठी निधीही दिला नाही.एखादं तरी काम त्यांनी केलं, असं सांगावं. आणि आता सत्ता नसताना ते विदर्भाचा विकास करायला जात आहे,हे अतिशय हास्यास्पद आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री असताना ते कधी घराबाहेर पडे नाहीत. विदर्भात त्यांचा एकही दौरा झाला नाही. आणि ते म्हणतायेत विदर्भाच्या दौऱ्यावर निघालोय. पण आता विदर्भाच्या जनतेला हे मान्य नाही अशी टीका गिरीश महाजनांनी केली.
