खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव – चंद्रशेखर बावनकुळे

“भाजपबरोबर राहायचे नसते तर २०१९ मध्ये युतीत निवडणूक लढवली नसती. त्यावेळी भाजप नेते अमित शहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शाहांनी शब्द फिरवला आणि आज त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांवर आयात नेत्यांच्या कार्यक्रमात सतरंज्या उलचण्याची वेळ आली”, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते त्यांच्या विदर्भ दौऱ्यात बोलत होते. यावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

“खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. “गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात” अशा शब्दांत निशाणा साधला आहे. यासोबतच “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले” असंही म्हटलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.