दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी देणार – मंत्री दीपक केसरकर

ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत १० बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी १४ वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.