उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक – चंद्रशेखर बावनकुळे

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं म्हणत आहेत. ही क्लिप ऐकवल्यानंतर “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरले.

याच पार्श्वभूमीवर आता अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही. तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तुम्ही वाहिले हेही महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

“उद्धव जी, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे. आमचे नेते हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते” असे बोचरे शब्द बावनकुळे यांनी वापरले.