राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली; आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी घडामोड. आता या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलं आहे. दरम्यान, तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे. हे सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं.

मुंबई हायकोर्टात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी हायकोर्टाने 13 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. त्या अपिलावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना आपली याचिका परत घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जून 2020 पासून हा मुद्दा कोर्टात अडकलेला होता. यादरम्यान सरकार देखील बदललं त्यानंतर तरी या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होईल असे वाटत होते. मात्र सप्टेंबर 2022 पासून कोर्टाने यावर स्थगिती आदेश ठेवला होता. त्यानंतर आज या प्रकरणातील एक याचिका मागे घेण्यास सुप्रिम कोर्टाने परवानगी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात नवी याचिका दाखल केली जाऊ शकते, तोपर्यंत राज्य सरकारसाठी नियुक्तीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.