राफेल खरेदी प्रस्तावाला मंजुरी; भारताचा फ्रान्ससोबत 90 हजार कोटी रुपयांचा करार

भारताची ताकद आणखी वाढली असून यामुळे शत्रू राष्ट्र चीन आणि पाकिस्तान ला धडकी भरणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 90 हजार कोटींचा संरक्षण करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी फ्रान्ससोबतच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्सकडून 26 राफेल-एम विमाने आणि तीन स्कॉर्पिन पाणबुडी विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आगमन झाले. मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान शुक्रवारी चर्चा झाल्यानंतर या खरेदी प्रस्तावाची घोषणा अपेक्षित आहे. यामध्ये चार विमाने ही प्रशिक्षक विमाने असतील अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांकडून मिळाली. करारावर सही केल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत विमानांच्या वितरणाला सुरुवात होईल. तसेच तपशीलवार किमतीच्या वाटाघाटी अजून सुरू आहेत, त्यामुळे अंतिम करार होण्यासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहितीही देण्यात आली.

फ्रान्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार असून त्यानंतर ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळय़ामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळय़ामध्ये भारताचे 269 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे.

या संरक्षण कराराअंतर्गत भारताला फ्रान्सकडून 26 राफेल-एम ही समुद्री लढाऊ विमानं मिळणार आहेत. त्याशिवाय तीन स्कार्पिन श्रेणीतील पाणबुड्याही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नौदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेल विमानं खरेदी करण्यात आले असून लवकरच ही विमानं भारतीय नौदलात सामील होतील. भारतीय नौदल आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर 26 राफेल-एम विमानं तैनात करणार आहे, त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना चोख प्रत्यत्तर देता येईल.