राज्यात पाऊस सक्रीय, पुढील १२ दिवस मुसळधार; या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेती कामांना वेग आला आहे. मात्र, जिथं अद्याप पावसानं दडी मारलीय, त्या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यातील कोकणासह मुंबई, ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.कोकणातील अन् विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच खान्देश, मध्य महाराष्ट्रासह १० जिल्ह्यांत आणि मराठवाड्यामधील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. राज्यात आता २७ जुलैपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्याच्या घडीला अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. इतकंच नव्हे, तर देशातील बहुतांश भागामध्ये सुरु आठवड्यामध्या पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळणार आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.