आज (18 जुलै) रोजी नवी दिल्लीत एनडीएची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी सोमवारी जाहीर केले की एनडीएच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत 38 पक्ष असतील. विरोधकांच्या बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीत भाजपने दिल्लीत बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी , जनसुराज्य, प्रहार चार पक्ष उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ही बैठक सुरू होणार आहे. तर रात्री 10 वाजेपर्यंत ही बैठक पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भोजनानंतर ही बैठक संपणार आहे. या बैठकीचं नियोजन भाजप नेते अमित शाह, जे पी नड्डांच्या मार्गदर्शनाखाली पियूष गोयल, भुपेंद्र यादव, विनोद तावडे , संबित पात्रा पाहणार आहेत.
आज होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या बैठकीला तब्बल 38 मित्र पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बैठकीचं निमंत्रण मिळालं आहे.त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस,प्रफुल्ल पटेल, बच्चू कडू , विनायक कोरे, रामदास आठवले आदी नेते देखील या बैठकीला उपस्थित राहतील. राज्यात भाजपचे मित्रपक्ष असलेले सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपपासून दूर गेलेल्या पक्षांना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.
