राज्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने शुक्रवारी पुन्हा मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे, गडचिरोली, यवतामाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि पालघरमधील शाळांना सुटी जाहीर केली गेली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे पावसाने सरासरी गाठली आहे. आतापर्यंत १०४ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील १७८ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर गेल्या आठ दिवसांत पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. मात्र, अतिमूसळधार पाऊस २८ जुलैपर्यंतच राहील आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. आज शुक्रवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे, तर २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेज अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. रत्नागिरीत तिसऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व शाळांना पालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यालाही शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
