पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे. सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत. या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.
आज पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्याचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करणार आहेत. या व्यतिरीक्त ते विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत
पुणे मेट्रोने प्रवासासाठी सवलत योजनाही आणली आहे. विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत तिकिटदरात देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत शनिवारी आणि रविवारी मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रोची सेवा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर दुपारी ३ वाजेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी मेट्रो खुली होणार आहे.
