पुणे आणि काशीला विशेष ओळख; पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला. टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला तसा त्यांनी शिवजयंती उत्सवदेखील सुरु केल्याचं मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही.”

लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची पूर्ण दिशाच बदलली होती. जेव्हा इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची तयारी दर्शवली नव्हती तेव्हा टिळकांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असं म्हटलं होतं. टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं असाही उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला.

लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील क्षमता ओळखली होती. त्यांनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान द्यावे, असं टिळकांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती चालविणाऱ्या श्यामजीकृष्ण वर्मा यांच्याकडे सावकरांची शिफारस केली होती. त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सावकरांनी लंडनमध्ये बॅरिस्टर बनावं, अशी टिळकांची इच्छा होती. अशा कित्येक युवकांना त्यांनी तयार केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक आणि सावकर यांच्या नात्यावर भाष्य केले.

“कुठलाही पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी वाढते. मला मिळालेल्या पुरस्काराशी टिळकांचं नाव जोडलंय. माझी जबाबदारी कैक पटीने वाढलीये. हा पुरस्कार माझ्या १४० कोटी जनतेला समर्पित करतो”, असं सांगतानाच तुमच्या सेवेत मी कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील मोदींनी देशवासियांना दिली. त्याचवेळी पुरस्काराची १ लाखाची रक्कम ‘नमामे गंगे’ योजनेसाठी देत असल्याचंही मोदींनी सांगितलं.