वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली आहे.यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.
महाराष्ट्रात वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. विदर्भात वाघांचा तर राज्याच्या अन्य भागांत बिबट्यांचा वावर लगतच्या वस्त्यांत होतो आहे. त्यातून नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले होतात. याबाबत वनमंत्री मुनगंटीवार यांनी भरपाईच्या रक्कमेत लक्षणीय वाढ केली आहे.याविषयी गेल्या आठवड्यात वनमंत्र्यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. मात्र भरपाईची रक्कम तसेच अन्य विषयांबाबत सदस्यांनी विविध सुचना केल्या होत्या. या सुचनांची दखल घेण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले होते.
यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले की, राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्य जीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे. मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणा-या रक्कमेपैकी रुपये 10 लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लाख पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये 10 वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ह्या पूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. त्यात वाढ करून वाढून 20 लाख रुपये करण्यात आली होती. आता ती 25 करण्यात आली आहे.
