पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. महिन्यातून दोन वेळा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र यांचा ‘मन की बात’ हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरला होता. त्यानंतर २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमातून राज्यातील शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला होता. तसेच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ची सुरुवात शेतकऱ्यांशी संवाद साधून झाली होती. कार्यक्रमापूर्वी राज्य सरकारने या कार्यक्रमात कोणत्या प्रश्नांना उत्तरे हवी, यासाठी जनतेकडून प्रश्नांची मागणी केली होती. व्हॉट्सअॅपवरून सुमारे १८ हजार प्रश्न-सूचना आल्या, तर १,२५० ई-मेल आले होते. त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली होती. राज्याच्या विविध भागांतून ३० शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम पहिला व अखेरचा ठरला. त्यानंतर चित्रीकरण न झाल्याने हा कार्यक्रम बारगळला. कार्यक्रम बंद होऊनही दर महिन्याला १९ लाख ७० हजारांचे बिल कंत्राट दिलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र, काँग्रेसचे हे सर्व आरोप माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने खोडून काढले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या सभा विविध जिल्ह्यांमध्ये घेत आहेत. त्यासभेअंतर्गत सरकारी योजनांचा जाग मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केला जातो. या सभांना प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सरकारकडून सतत केला जातो. अशातच मुख्यमंत्री शिंदे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, असे म्हणत जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणार आहेत.हा कार्यक्रम महिन्यातून दोनदा आणि वर्षातून चोवीस वेळा होईल. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओवर नव्या स्वरूपातील हा कार्यक्रम दाखविला व ऐकविला जाईल. या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी ई-निविदा प्रसिद्ध करून संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा शासननिर्णय गुरुवारी झाला.
