मुंबईतील आरोग्य सेवे बाबतची चर्चा आज सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात झाली. चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील आरोग्य सवेचा आढावा सभागृहासमोर मांडला.
आशिष शेलार म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून रुग्ण सुध्दा मोठया प्रमाणात मुंबईत येतात. मुंबईत महापालिका, राज्य शासन, खाजगी, धर्मदाय, आणि केंद्रीय कामगार अशी विविध रुग्णालये असून या सगळयाचा ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने एकदा या सगळयाचा एक समग्र आढावा घेऊन किती रुग्ण मुंबईत येतात, त्यांना असलेली रुग्णालये पुरेशी आहेत का? त्यावर किती खर्च होतो या सगळयाची श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी शेलार यांनी केली.धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणारी जी रुग्णालये आहेत त्यांना सरकारकडून देण्यात येणा-या सुविधा व रुग्णालयाकडून मिळणारी सेवा याबाबतचा आढावा घेऊन त्याची पडताळणी करण्यात यावी. त्यांच्याकडून शासनाच्या अटीशर्ती पाळण्यात येतात का, अशी दुसरी मागणी आमदार शेलार यांनी केली.
दरम्यान, या चर्चेमध्ये आमदार मनिषा चौधरी यांनीही उपनगरातील रुग्ण्सेवेचा उडलेला बोजवारा मांडला. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय समांत यांनी मुंबईतील आरोग्य सेवेची श्वेतपत्रीका काढण्याची गरज मान्य केली. तसेच मुंबई महापालिका रुग्णालयातील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.
