मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.पेडणेकर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे ही कारवाई त्यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.
मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकरांसह महापालिकेच्या इतर 2 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय म्हणणं आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या तक्रारीनंतरच पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे म्हटलं जात आहे. किशोरी पेडणेकांविरोधात गुन्हा दाखल होताच सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. “कोविड घोटाळा. उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोविड कफन मध्ये ही कमाई केली. 1,500 रुपयांची बॉडी बॅग 6,700 मध्ये विकत घेतली. वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल,” असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
