बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को ही कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुजोरा दिला. बारसू रिफायनरीला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांबरोबर जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असून, पाकिस्तानला तिचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाण्यावरुन श्वेतपत्रिका सरकारने सादर केली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ‘नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतं’ असल्याचे ते म्हणाले. त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किमान आदित्य ठाकरे यावर अभ्यास करून बोलतील, असे वाटलं होत, मात्र आदित्य ठाकरे यांनी डोळ्यांनी पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय? असं फडणवीस म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवीन युगातील आव्हाने पेलण्यासाठी पोलिस दल सज्ज असेल असा विश्वास आहे. देशातील सर्वात मोठा सायबर प्लटफॉर्म आपण महाराष्ट्रात तयार करत आहोत. एकाच फ्लॅटफार्मवर सगळ्यांना आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याद्वारे सायबर गुन्हेगारी मोडून काढता येईल. लवकरच 18 हजार पदांची पोलिस भरती देखील होणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्ट म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे, ते अयोग्य आहे. उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये, याबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचा समाधान आहे की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट असे चालू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
