महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती. महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार देण्यात आला. यंदापासून या पुरस्काराची सुरुवात झाली. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार पण देण्यात येणार आहे. रतन टाटा यांचे सामाजिक आणि उद्योगातील मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.

‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे. रतन टाटा यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण, भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा हेही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.