फडणवीस ‘गृह मंत्री’ आहेत, ‘गृह बसे’ मुख्यमंत्री नाहीत – आशिष शेलार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावरून भाजपातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही ‘मुख्य’ विषय आणि स्वतःची ‘मुख्य’ पातळी सोडून तुमच्या ‘उप’ पातळीवर येणारच असाल, तर आम्ही कोकणातील, अस्सल मालवणी मुलखातील आहोत. मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे नेते असो वा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो आपल्याला मिळालेले प्रत्येक पद, जबाबदारी मानून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात “एसटीपेक्षा” जास्त फिरून गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस, शेतकरी, श्रमिकांचे अश्रू पुसणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र काम करणारे, देवेंद्र फडणवीस हे आज “मुख्य” असले काय आणि “उप” असले काय. ते स्वयंसेवक आहेत. त्यांना काम करण्यासाठी तुमच्या सारखी “प्रमुख” पदे लागत नाहीत. त्यामुळे देवेंद्रजींची कुणी “घरबशांनी” शिकवणी घेण्याची गरज नाही. अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो. अहो, फडणवीस गृह मंत्री आहेत..”गृहबसे” “मुख्य” मंत्री नाहीत, हे विसरू नका.

देवेंद्र फडणवीस यांना कुणा ‘घरबशांनी’ शिकवणी घेण्याची गरज नाही. अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो की, फडणवीस गृहमंत्री आहेत, ‘गृहबसे’ मुख्यमंत्री नाहीत, हे विसरू नका! ‘फडणवीस सांभाळा’ असा अग्रलेखातून सल्ला देणाऱ्यांना आम्ही सांगतो तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा, जमले तर अजून तुमच्या पत्रकार पोपटलाल यांना आवरा नाही तर नॅनोत मावेल एवढाच पक्ष उरेल, असा उपोधिक सल्लाही त्यांनी दिला आहे.

पक्षाचे 40 आमदार 12 खासदार पक्ष सोडतात, नगरसेवक, मंत्री, कार्यकर्ते सगळे “जय महाराष्ट्र” करुन निघून जातात त्या अर्धग्लानी अवस्थेतून तुम्ही बाहेर अद्याप आलेले नाहीत. त्या अवस्थेत असल्यानेच तुम्हाला आपली गेलेली “मुख्य” अवस्था सतावते आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या टीकेचे विषय आहेत. तुम्ही आणि तुमचे संपादक महर्षी ‘पत्रकार पोपटलाल” उठसूट सामनातून टीका करता, पण लक्षात ठेवा आम्ही एका संस्कारातून आलेले आहोत. संघ शाखेत आम्ही जे शिकलो ते तुम्ही न शिकल्याने तुमची ही अवस्था झाली आहे. अशा शब्दात संजय राऊतांर यावेळी आशिष शेलार यांनी टीका केली.