“निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”, अमित ठाकरेंचा थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका अचानक रद्द केल्यानं राज्यात त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. याच विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. सिनेट निवडणुकीच्या स्थगितीनंतर अमित ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मनविसेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच पदवीधरांसाठी खूप भयानक निर्णय आहे. पहिल्या ड्राफ्टमध्ये चुका काढल्या. त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टमध्ये देखील चुका काढून उमेदवारांना बाद केलं. त्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या 12 तास आधी निवडणूक थांबवण्यात आली, हे चुकीचं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका जाहीर न झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले होते. सिनेटच्या निवडणुका घेण्यासाठी मुख्यमंत्री घाबरत आहेत’,असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीवेळी लपून बसतात आणि स्थगिती मिळाल्यानंतर बिळाच्या बाहेर पडतात. निवडणुकीत उतरावे. त्यांच्या १० सिनेट सदस्यांनी त्यांची ५ कामे दाखवावीत, असे आव्हानही अमित ठाकरेंनी दिले.आदित्य ठाकरे यांना या बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले की, “मी काही लोकांवर बोलत नाही, त्यांना टिका करु दे. कार्यक्रम जाहीर झाल्यावर निवडणुका स्थगित होणं धोकादायक आहे. लोकसभेच्या निवडणुकाही अशाच स्थगित होऊ शकतात.

अमित ठाकरे हे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना सिनेट निवडणुकांबाबत पत्र लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. यानंतर ते राज्यपाल बैस यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया अचानक रद्द झाल्याने ठाकरे गट-मनसे-भाजपमध्ये चांगलेच रणकंदन सुरू झाले आहे. यामुळे या निवडणुकीबाबत आता काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.