पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता, अहंता आणि धर्मांधतेला आज जगाला तोंड द्यावे लागत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवक म्हणाले. नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले. स्वार्थ आणि लालसेतून उद्भवलेल्या युक्रेन किंवा गाझा पट्टी येथील युद्ध वा तदृश तंट्यांची सोडवणूक दृष्टीपथात दिसत नाही. निसर्गाशी विसंगत जीवनशैली, स्वैराचार आणि भोगवादातून नवे नवे मनोविकार आणि शरीरव्याधी उत्पन्न होत आहेत. विकृती आणि अपराध वाढताना दिसताहेत. आत्यंतिक व्यक्तिवादामुळे कुटुंबे मोडून पडताना दिसत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यासोबतच मोहन भागवत म्हणाले की, येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात.असे भागवत म्हणाले.
आपला देश जी-20 नावाच्या प्रमुख राष्ट्रांच्या परिषदेचा यजमान होता. वर्षभरात भारतात अनेक ठिकाणी राष्ट्राध्यक्ष, मंत्री, प्रशासक आणि सदस्य राष्ट्रांच्या महानुभावांचे अनेक कार्यक्रम झाले. भारतीयांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा अनुभव, भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील रोमांचक प्रवासाने सर्व देशांतील सहभागी अत्यंत प्रभावित झाले.
प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंनी 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 107 पदकांची कमाई करीत प्रथमच 100 हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांनाच प्रोत्साहित, आनंदित केले आहे. त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ‘चांद्रयाना’च्या निमित्ताने उदयोन्मुख भारताच्या शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकही जगाने पाहिली आहे. इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. सर्व भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे काम ज्या शास्त्रज्ञांनी पूर्ण केले त्यांचे आणि त्यांना बळ देणाऱ्या नेतृत्वाचे, देशभर सर्वत्र कौतुक होत आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल मोहन भागवत यांनी सांगितले की, ‘रामाचा फोटो आपल्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे. त्यांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जात आहे. राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. आपण सगळे जाऊ शकणार नाही, पण आजूबाजूच्या मंदिरात जाऊ शकतो. आपण देशात धार्मिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.
