राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जयंत पाटील हेदेखील आमच्यासोबत येणार होते, असा गौप्यस्फोट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. फक्त एका गोष्टीमुळे ते आमच्यासोबत आले नाहीत, असं ते म्हणाले.
अजित पवार यांनी ८ आमदारांना सोबत घेऊन २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता त्यांच्यासोबत ४५ आमदार असल्याचा दावा केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद निवडणूक आयोगामध्ये आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आमचाच पक्ष खरा असल्याचा दावा दोन्ही गटांकडून होतेय.
हसन मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटील यांनीसुद्धा आमच्यासोबत शपथ घेतली असती पण ते एका घटनेमुळे थांबले. जयंत पाटील का थांबले ते सांगणार नाही पण कधीतरी नक्की सांगेन असे हसन मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेवर हसन मुश्रीफ यांचं मौन राहणे पसंत केले. मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली पण मी त्यांचं समाधानकारक उत्तर दिलेला आहे असे त्यांनी सांगितले. न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
