बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही दिसत आहे. पुढील 24 तासांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणामी राज्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
आज (4 डिसेंबर) रोजी ओडिशात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह, दक्षिण किनारपट्टी आणि लगतच्या दक्षिण अंतर्गत ओडिशाच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 5 डिसेंबर रोजी याच प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत हुडहुडी
पुढील चार ते पाच दिवस मुंबईत थंडीचा हा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विविध भागातही तापमान 15 अंशांच्या खाली गेले आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 पथकं तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती च्या बैठकीत चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
