पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ राज्यांना अलर्ट

देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं गारठा वाढला आहे, तर कुठं पावसानं धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामध्ये दक्षिण तामिळनाडूमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहेत. दक्षिण तामिळनाडूच्या थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात मागील 24 तासांत 400 ते 950 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिणी तमिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.उर्वरित तामिळनाडू आणि किनारी कर्नाटकात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

काश्मीरच्या मैदानी भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेला आहे. हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडी झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी, पूर्वांचल आणि बिहारच्या अनेक भागात किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.

दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे. काही भागात थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमानात 21 डिसेंबरनंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.