ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का; अलाहाबाद हायकोर्टानं सर्व याचिका फेटाळल्या

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी ६ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मशिदीचे सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टाने अनुमतीही दिली आहे. सर्व्हे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाइने धार्मिक स्थळांच्या पूजाअर्चनेत बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. सुन्नी वक्फ बोर्ड या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच, इंतजामिया कमिटीही सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावणार आहे.

दरम्यान, मुस्लिम पक्षकारांच्या वतीनं हिंदू पक्षकारांच्या 1991 च्या खटल्याला आव्हान देणार्‍या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या, ज्या न्यायालयानं फेटाळल्या आहेत. अंजुमन इंतेजामिया कमिटी आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं 1991 मध्ये वाराणसी कोर्टात दाखल केलेला मूळ खटला कायम ठेवण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

या प्रकरणी 8 डिसेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. एकूण 5 याचिकांवर सुनावणी सुरू होती, त्यापैकी 2 याचिका सिविल वादावर होत्या आणि 3 याचिका ASI सर्वेक्षण आदेशाच्या विरोधात होत्या. दोन याचिकांमध्ये, 1991 मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मूळ खटला कायम ठेवण्याला आव्हान देण्यात आलं होतं. न्यायालयाच्या जागेच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला तीन याचिकांमध्ये आव्हान देण्यात आलं होतं.