उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत, अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उपसभापतींवर आरोप करताना अंधारे यांनी धंगेकर हे या सभागृहाचे सदस्यच नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन.
सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक होतांना पाहायला मिळाले. विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर हे विधान परिषदेचे सदस्य नसताना माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे. त्यामुळे अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सुषमा अंधारे अशाप्रकारे कसं बेजबाबदारपणे बोलू शकतात. त्या नेहमीच बोलतात मात्र, मात्र सभागृहाच्या सभापतींच्या विरोधात बोलत असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. सुषमा अंधारे माहिती न घेता सभापतींचे अवमान करणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. माझी या सभागृहात मागणी आहे की, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे, असे दरेकर म्हणाले.
