कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; देशभरात 23 रुग्ण

तीन वर्षांपूर्वी भारतासह जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या, लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने लोकांचं टेन्शन पुन्हा वाढायला लागलं असून गेल्या काही दिवसापासून देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची चर्चा होती तर आता गोव्यामध्येही करोना विषाणूचा नवा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.1’चे रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या जेएन.1 या नव्या विषाणूचे रुग्ण जगभरात वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 40 देशात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये जेएन .1 या विषाणूचे आतापर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण गोवा येथे आढळले आहेत. गोवामध्ये जेएन.1 विषाणूचे 19 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर केरळ आणि महाराष्ट्रात जेएन.1 या कोरोना विषाणूचे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत.

बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना संसर्गाची 614 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी 21 मे नंतरची सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली असून केरळमध्ये गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या संख्येमुळे मृतांचा आकडा 5 लाख 33 हजार 321 वर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.1 चा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी आढळला होता. केरळमधील एका व्यक्तीला या व्हेरिएंटची लागण झाली होती. त्यानंतर एकाच दिवसांत 3 जणांचा मृत्यू झाल्याने सरकार अलर्टवर आले.दुसरीकडे केरळपाठोपाठ महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये देखील या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वनचा नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे.संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरल्याने , त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने पुन्हा तयारी सुरू केली आहे. पण नागरिकांनी स्वत:ही खबरदारी घेऊन, योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.