राज्यातील ११६ बाजार समित्यांना मिळणार शेतकरी भवन

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यासाठी शेतकरी भवन नसलेल्या ११६ बाजार समित्यांना प्रत्येकी १.५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासाठी पणन विभाग ५० ते ७० टक्के निधी देणार असून, उर्वरित खर्च संबंधित बाजारसमितीने करायचा आहे. या निर्णयामुळे राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.

राज्यात ३०६ बाजार समित्या व ६२३ उपबाजार समित्या आहेत. या सर्वांमध्ये कृषिमालाची खरेदी व विक्रीचे वर्षाकाठी सुमारे ६० हजार कोटींचे व्यवहार होतात. काही बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने रात्री कृषिमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारा उपलब्ध होत नाही. त्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे.दरम्यान, यासाठी शेतकरी भवनाचे मॉडेलदेखील ठरवण्यात आलेले आहे. दरम्यान, यात तळ मजल्यावर बहुउद्देशीय हॉल, तीन शॉप, तर पहिल्या मजल्यावर प्रत्येकी चार रूम, तसेच एकूण २० बेड असलेली ही इमारत बाजार समित्यांमध्ये उभारण्यात येणार आहे. तसेच ह्या प्रत्येक शेतकरी भवनासाठी १.५२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ३० ते ५० टक्के खर्च हा बाजार समितीलाहि करावा लागणार आहे. तसेच उर्वरित निधी हा राज्य सरकार देईल..

नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गवारीनुसार अ आणि ब वर्गातील बाजार समित्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येईल; तर क आणि ड वर्गातील बाजार समित्यांना ७० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात अ (४३), ब (२३), क (१८), ड (३२) वर्गात बाजार समित्यांचा समावेश आहे.