घेतलेल्या भूमिकेत कोणताही बदल नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शुक्रवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, यामध्ये कुठेही मॅचफिक्सिंग नाही, याबाबतीत आता आपण खूप पुढे गेलो आहोत, आपण भूमिका घेतली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमाना प्रमाणे नवी पिढी पुढे येत असते. त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते असं अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता सुनावलं. काही जण जाणीवपूर्वक पसरवत आहेत की अजित पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार, पण असं काही नाही. आमच्या सारखं लवकर उठून कामाला लागा, आमच्या सारखं एकदम पहाटे कामाला लागू नका, पहाटेची स्वप्न बघा चांगली असतात असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या, लोकसभा नंतर लगेच चार महिन्यात विधानसभा आहे. आता लोकसभा महत्वाची आहे. पण निवडणुकांनंतर विधानसभेचीही तयारी करायला हवी. आपण लोकसभेच्या सर्वाधिक सहा- नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, अशा सूचना देखील अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मित्र पक्षाविषयी बोलताना तारतम्य बाळगा, विनाकारण मित्र पक्षावर टीका करू नका. अशा कानपिचक्या अजित पवारांनी अमोल मिटकरींना दिल्यायत. मिटकरींनी संघाच्या बौद्धिक कार्यक्रमावरून टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी मिटकरींचे नाव न घेता कान टोचलेयत. भाजप, शिवसेना, एनसीपी असं तिघांना एकत्र निवडणुका लढायच्या आहेत हे लक्षात ठेवा असं अजित पवार म्हणालेत.