पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्यामाध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात कर्करोगावर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सामान्य नागरिकांना कर्करोगाचे मोफत उपचार मिळावेत, याकरीता त्यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करुन देण्यात येईल, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत मिळण्यास मदत होणार आहे.
