पुणे शहर आणि कुरकुंभ पाठोपाठ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल 800 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. पुणे पोलिसांनी गेल्या 24 तासांत सुमारे दोन हजार कोटी रुपये किमतीचे 950 किलो अमली पदार्थ जप्त केले. देशातील अमली पदार्थ तस्करीतील बडे तस्कर सामील असून त्यांच्या शोधासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या (एनसीबी) मदतीने संपूर्ण देशभरात तपास सुरू करण्यात आला आहे.
पुणे ड्रग्स तस्करी प्रकरणाचे नायजेरीयन कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली होती. पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरियन नागरिकाने अमली पदार्थ दिले होते. याची किंमत कोट्यवधी रुपये होती. शेखकडे हे एमडी ड्रग्स भारतातील विविध भागात पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नायजेरियन नागरिकाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक रवाना झालं होतं. त्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाच्या हाती अमली पदार्थांचे घबाड हाती लागलं आहे.
पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊन नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांनी शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या शाखांनी पुणे, कुरकुंभ आणि दिल्ली येथेही छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. दिल्ली क्राईम ब्रँचने टाकलेल्या पहिल्या छाप्यात 600 किलो ड्रग्ज सापडले होते तर दुसऱ्या छाप्यात 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
जप्त करण्यात आलेले ड्रग्ज भविष्यात कोणत्याही न्यायालयीन प्रक्रीयेत अडकू नये पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. म्हणून हे जप्त करण्यात आलेले मेफेड्रॉन फॉरेन्सीक लॅबला पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
