महाराष्ट्रात महायुतीला 45 जागा मिळण्याचा अंदाज; देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी

महायुतीमध्ये अजित पवारांना सहभागी करून घेण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनिती चांगलीच यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. झी न्यूज आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलममध्ये महायुतीला लोकसभा निवडणुकीत तब्बल 45 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. आपल्याला आठवत असेल राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आल्यावर इंडिया टूडेचा एक सर्व्हे आला होता. त्यामध्ये महाविकास आघाडीला 26 तर महायुतीला 22 जागा मिळत असल्याचे दिसून आले होते. यामुळे एकनाथ शिंदे यांचा काही फायदा झाला नाही असे म्हटले जाऊ लागले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतले. अजितदादा यांच्यासोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आली. यामुळे राष्ट्रवादीची मते महायुतीकडे आलीच पण त्यापेक्षाही मोठा फटका महाविकास आघाडीला बसला, मानसिकदृष्ट्या ही आघाडी खचून गेली. त्याचेच प्रत्यंतर या सर्व्हेमध्ये दिसत आहे.आता या सर्व्हेमध्ये काय म्हटले आहे हे पाहू.

ठाकरे पवार यांच्यासह काँग्रेसच्या महाविकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप महायुतीला तब्बल 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सह ठाकरे आणि पवार एकत्र असताना मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला असताना महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस – पवार सरकार विरुद्ध काहीही वातावरण निर्मिती होऊ शकली नाही .

या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाला 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 आणि मतांमध्ये 4.6 % वाढ होईल. महाविकास आघाडीच्या जागा 6 ने कमी होतील आणि मतांमध्ये 4.1 % घट होईल.

अजित पवार गट एनडीएत सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आले होते. 28 % लोकांनी मोठ्या प्रमाणात तर 32 टक्के लोकांना काही प्रमाणात असं मत नोंदवलं आहे. याचा अर्थ 60 टक्के लोकांनी अजित पवारांचा महायुतीला फायदा होईल असे म्हटले आहे. 22 % लोकांनी मात्र अजित पवारांमुळे नुकसान होईल असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता 36 % लोकांनी आपण काही प्रमाणात संतृष्ट असून, कामकाज ठिकठाक असल्याचं म्हटलं आहे, तर 32 % लोकांना कामकाज चांगलं असून, फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 26 % लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत नोंदवलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून

चांगलं काम केल्याची पावती देण्यात आली आहे.

कर्नाटकात नुकतेच सत्तांतर होऊन काँग्रेसचे सरकार आले आहे. मात्र आता लोक काँग्रेसवर चिडल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकात एनडीएला 23 तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

एकेकाळचे तथाकथित मराठा स्ट्रॉंगमन शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नसल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. सध्याच्या घडीला सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय मराठा नेता कोण? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एकनाथ शिंदेंना सर्वाधिक 36.2 टक्के मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 21.3 मतांसह उद्धव ठाकरेआणि 20.6 टक्के मतांसह शरद पवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा अपवाद वगळता देशात सर्वत्र इंडी आघाडीचा दारुण पराभव होत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे देशात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.