ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचं अभिंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठं आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील मूर्ती यांची उपस्थिती असणं ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचं नशीब घडवण्यात असलेलं महिलांच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा”
सुधा मूर्ती या लेखिका तर आहेतच, पण त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इन्फोसिसच्या सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सन २००६ मध्ये त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील शिगगाव इथल्या आहेत. आयआयएससीमधून त्यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी आजवर २० विविध विषयांची पुस्तके लिहिली आहेत.
भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग कंपनी असलेल्या टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत. सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. तर रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत.
