आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर कमी करुन सर्वांना दिलासा दिला आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचे दर रक्षा बंधनच्या दिवशी कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले. दर कपातीनंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये झाली आहे. जयपूरमध्ये 806.50 रुपये आणि पटनामध्ये 901 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. तसेच कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे.
लोकसभेमुळे गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता हे खरं ठरलं आहे. मोदी सरकारने आज महिला दिनी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
“आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
उज्ज्वला योजना आणखी वर्षभर सुरू
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱे अनुदान 2024-25 मध्येही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान 300 रुपये प्रति सिलिंडर इतकं आहे. याचा फायदा 10 लाख लाभार्थ्यांना मिळेल. वर्षभरात 12 सिलिंडरवर अनुदान मिळणार आहे. दिल्लीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दर 903 रुपये इतका आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत हेच सिलिंडर 603रुपयांना मिळेल.
