महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट यांच्यामध्ये वाटाघाटीसंदर्भात सातत्याने बैठका सुरु आहेत, मात्र अद्यापही मार्ग निघालेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे भिजत घोंगडं पडलं आहे, असा आरोप होतोय.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप करत संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपण काँग्रेसशी स्वतंत्र बोलणी सुरु केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र काँग्रेसकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आंबेडकरांनी व्यक्त केली.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता. 12 मार्च) अमरावती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मविआतील जागावाटपाबाबत चर्चेसंदर्भात माहिती दिली. याचवेळी त्यांनी संजय राऊत खोटे बोलत असल्याचा आरोप केला. “संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर खोटे ब्रिफिंग करतात. वंचितने आमच्याकडे जागाच मागितल्या नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. पण वंचित त्याचवेळी जागा देईल, ज्यावेळी यांच्यातील भांडणे मिटलेली असतील,” असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले.
रमेश चेन्नीथला यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आम्ही सर्व माहिती देण्यात आली आहे. मविआचे जागावाटप होत नाही, तोपर्यंत काँग्रेस आणि वंचितचे जागावाटप करून घेऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र त्यालाही अद्याप काँग्रेस कार्यालयाकडून प्रतिसाद आलेला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसनं त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. मविआ एकत्र राहिली तर माझा प्रश्न येतो. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ. मोदींना घालवायचं की पक्ष वाढवायचा हे काँग्रेसनं ठरवावं. संजय राऊत यांच्यासोबत आम्ही चर्चेसाठी बसत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
