“साहेब मला माफ करा”, वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

डॅशिंग, तडफदार, जनतेमध्ये वावरणारे नेते म्हणून वसंत मोरेंची ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय. पक्षाच्या स्थापनेपासून मी आपल्यासोबत आहे. आपण मला वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी मी पार पाडल्या. पक्ष संघटना वाढीसाठी मी 18 वर्षे सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून कार्य केले. मात्र पुणे शहरातील वरिष्ठ सहकाऱ्यांकडून माझ्याविरोधात गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझ्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

वसंत मोरे यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोसमोर हात जोडून उभे आहेत. याच फोटोला कॅप्शन देत त्यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” लिहिले आहे. तर. एका फोटोत ते राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. तर त्यांनी या पोस्टमध्ये आपले राजीनाम्याचे पत्रही प्रसिद्ध केले आहे.

काय म्हणालेत वसंत मोरे?

“पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.

“परंतु, अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कॉडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.