चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. येथे १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, डॉक्टर जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, येथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बॉटनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे, येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहे, याचा आनंद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे लोकप्रतिनिधी लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायची, हे सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवून दिले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली.
