मुंबईतील 8 ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामांतर; ब्रिटिशांनी दिलेली नावे होणार इतिहासजमा

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीला राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांचे लवकरच नामांतर होणार आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.

केंद्र सरकार ब्रिटिशांची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी आहे. या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाली. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे’, असे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबईच्या रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख शिर्षक देत राहुल शेवाळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, भारतीय पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे देखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती. म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्यावतीने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या मागणीनुसर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव सर्व्हेअर ऑफ इंडियाकडे जाऊन सुधारित रेल्वे स्थानकांची नावे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या गृह आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पुढील दहा दिवसांत रेल्वे स्थानकांतील नामफलक बदलण्यात येतील. भारतीय रेल्वेच्या अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस), प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (पीआरएस) स्थानकांच्या आद्याक्षरानुसार बदल करण्यात येणार आहेत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नामांतरासाठी प्रस्तावित रेल्वे स्थानके

  1. करी रोड – लालबाग
  2. सँडहर्स्ट रोड – डोंगरी
  3. मरीन लाईन्स – मुंबादेवी
  4. चर्नी रोड – गिरगाव
  5. कॉटन ग्रीन -काळाचौकी
  6. डॉकयार्ड – माझगाव
  7. किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ
  8. मुंबई सेंट्रल – नाना जगन्नाथ शंकरशेट